कोकणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार !

पोलीसनामा ऑनलाईन टीम, दि. 17 जानेवारी : सिंधुदुर्गमधील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाच्या उदघाटनाचा मुहूर्त अखेर निश्चित झालाय. 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्त उदघाटन होणार आहे. या विमानतळाच्या उदघाटनाच्या निमित्ताने बर्‍याच वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

या उदघाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेही उपस्थित राहणार आहेत, असं समजतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. नारायण राणे यांच्यासह त्यांचे सुपुत्र निलेश व नितेश सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करतात.

अनेकदा राणे यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा यांचा एकेरी उल्लेख करुन टीका केलीय. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत राणेंना प्रत्युत्तर दिलंय. अशा परिस्थितीत ठाकरे आणि राणे एकाच मंचावर येणार असल्याने संपूर्ण राज्याचं या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 23 जानेवारीला चिपी विमानतळाचे उदघाटन करण्यात येणार आहे. या विमानतळाचे उदघाटन प्रजासत्ताक दिनी होणार आहे, अशी चर्चा सुरू होती. पण, आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा दिवस उदघाटनासाठी निश्चित केलाय.