कुंडल्या बघणारे हात आता पुस्तक वाचू लागले आहेत, मुख्यमंत्री ठाकरे यांचा फडणवीस यांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तक आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचे संदर्भ फडणवीस यांनी दिले होते. त्यावरुन मुख्यमंत्री ठाकरेंनी हा टोला लगावला आहे.

विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुस-या दिवशी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. त्या सगळ्याला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिले आहे. आज त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलही भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची लढाई अंतिम टप्प्यात पोहचली आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी वकिलांची फौज आणली आहे. मराठा समाजाच आरक्षण टिकेल हा विश्वास मला आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

कोरोनावरुन आमच्यावर टीका करत आहेत. मात्र राज्याने एकही आकडेवारी पहिल्या दिवसापासून लपवलेली नाही. विरोधकांनी आमच्यावर टीका जरुर करावी आम्हाला काहीही आक्षेप नाही. मात्र आपल्या धारावी मॉडेलच कौतुक जगाने केले आहे. या गोष्टी विरोधकांना दिसत नाही का? डॉक्टरांची टास्क फोर्स निर्माण करणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. तसंच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजनाही महाराष्ट्रात योग्य पद्धतीने राबवण्यात आली. याचेही कौतुक झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या राजकारणात सक्रिय व्हाव असे मला वाटते ही सुधीर मुनगंटीवार यांचीही हीच इच्छा आहे असेही उद्धव ठाकरे यांनी हसत हसत म्हटल. त्यावर नाना पटोले यांनी आमच्या मित्राच्या मागे का लागता असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही इथेच थांबा तुम्ही कुठे जाऊ नका. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

विकृत राजकारण आम्ही करत नाही : ठाकरे
महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी जाहीर झाली आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे. “महाराष्ट्रात काही सरकारविरोधात काही बोललं तर तुरुंगात टाकलं जातं, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे असा आरोप आमच्यावर झाला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब त्याला नातू झालेला नाही नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती. किंवा उद्या सांगतीलही की प्रताप सरनाईकांना नातू झाला तर आधी इथे घेऊन या. हे सगळ काय आहे? ही विकृतीच आहे. असे विकृत राजकारण आम्ही करत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.