मुख्यमंत्री ठाकरे यांनी PM मोदींकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्य सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यामधील वाद सर्वोच्च न्यायालयात निर्णायक वळणावर आला असताना विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये. त्यामुळे अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

कोरोना संसर्गाचा किती काळ असाच राहणार याचे उत्तर नाही. म्हणून विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार असा प्रश्न करीत विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करावे. त्यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकर घ्यायला हवा. तसेच विद्यार्थ्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांची तोंडी परीक्षा घ्यावी. हे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास सुरु असलेल्या कोरोना युद्धात त्यांची मदत घेता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार व उत्तरप्रदेश या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद साधून त्या त्या राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यात राज्याच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, देशातच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यात आहेत. या दहा राज्यांनी केलेल्या प्रयत्नाने कोरोना हरेल आणि देश जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक जिल्ह्यात साथरोग नियंत्रन रुग्णालय

राज्यात सर्व जिल्ह्यात साथरोग नियंत्रण रुग्णालय सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी म्हटलं. तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना नंतर इतर आजारांनी ग्रासल्याचं दिसून आले असून, कोरोनानंतर उपचाराची सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी सांगितलं.

कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही

कोरोनाची रुग्णसंख्या व मृत्यू झालेली एकही नोंद महाराष्ट्राने लपवली नाही. धारावी, वरळीतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून, अजूनही लढाई संपली नाही. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ठाकरे म्हणाले.