‘…तर त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आले. आणि सर्वत्र खळबळ उडाली. संजय राठोड हे १५ दिवस समोर न आल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. सध्या राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी कथित आरोप असणारे ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन केले. यावरून भाजपने राज्य सरकार व शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

पोहारादेवी येथी झालेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत की नाही, हे मला माहीत नाही. सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे पोहरादेवी प्रकरणात कोणीही सुटणार नाही. तसेच, या प्रकरणावरुन राज्यातील महाविकासआघाडीत कोणतीही खदखद नाही. मात्र, जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत, असे विनायक राऊत यांनी सांगितले. याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवून केलेले शक्तीप्रदर्शन अयोग्य होते, असे सांगत याप्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर नक्की कारवाई होईल, असे विनायक राऊत म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करणे योग्य ठरणार नाही.

याचबरोबर, संजय राठोड प्रकरणात भाजपाने केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपाकडे आरोप करण्यापलीकडे दुसरे काहीच उरले नाही. या प्रकरणाची निपक्ष:पातीपणे चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, या प्रकरणात आरोप करणाऱ्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, संजय राठोड यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. परंतु त्यांना भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, यानंतर उद्धव ठाकरे यांनी केवळ दोनच मिनिटं संजय राठोड यांच्याशी संवाद साधला. संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते, ऊर्जामंत्री नितीन राऊतदेखील वर्षा बंगल्यावर पोहोचले. संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का, याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही.