महाराष्ट्रात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कुणाच्या भल्यासाठी आले ?; योगींच्या दौर्‍यावर प्रश्नचिन्ह

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्र राज्याच्या दौर्‍यावर असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र राज्यातील उद्योगधंदे उत्तर प्रदेशकडे येतील, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर योगींवर मोठी टीका झाली. कारण उत्तर प्रदेशातील उद्योगासाठींची असुरक्षितता आणि गुन्हेगारी सर्वांना माहीत आहे. उत्तर प्रदेश राज्यामध्ये असणार्‍या अडचणींमुळे तिथले नागरिक महाराष्ट्र राज्यात कामासाठी येतात. मात्र, सध्या महाराष्ट्र दौर्‍यावर आलेले उत्तर प्रदेश राज्याचे योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली जात आहे. योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात कुणाच्या भल्यासाठी आले होते? असा सवालही उपस्थित होतोय.

उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वांत अधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. अधिक लोकसंख्येमुळे उत्तर प्रदेशात बेरोजगारांचं प्रमाण अधिक आहे. उत्तर भारतीय राज्यांचा विचार केला असता, विषेशतः बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून कामासाठी महाराष्ट्रात येणार्‍यांचं प्रमाण अधिक आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या ठिकाणी उत्तर भारतातील कामगारांचं प्रमाण अधिक आहे. हे सर्व कामगार महाराष्ट्रात उत्तम पगार, उत्तम राहणीमान आणि सुरक्षितता असल्याने आकर्षित होत असतात.

महाराष्ट्रात विविध उद्योगांसाठी पोषक वातावरण असून, चांगली वाहतूक व्यवस्था, भारतातील वित्तीय संस्थांचे केंद्र असणारे मुंबई, विस्तीर्ण समुद्र किनारा, आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीसाठी पोषक बंदरदेखील आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात गुंतवणूक करताना महाराष्ट्राकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे महाराष्ट्र विविध उद्योगधंद्यांच्या निर्देशांकामध्येही अव्वल आहे.

उत्तर प्रदेशने सुरुवातीला पायाभूत सविधा, प्रशासनाचा दर्जा, औद्योगिक धोरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि कायदा व्यवस्थेकडे लक्ष द्यायला हवे. त्यानंतर आपोआप उत्तर प्रदेशात गुंतवणूक अधिक प्रमाणात वाढेल. सध्या महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनी या मुद्द्यांवर लक्ष दिले आहे. त्यामुळेच आज ते देशातील प्रगत राज्ये ठरत आहेत, असेही मत अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी व्यक्त केलंय.

’उद्योगपतींनी उत्तर प्रदेश राज्यात गुंतवणूक कराल, तर तुम्हाला तिथं सुरक्षा, आदर आणि उद्योगधंद्यांना अनुकूल वातावरण मिळेल’, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र राज्याच्या 2 दिवस दौर्‍यावर होते. त्यांनी यावेळी बर्‍याच उद्योजकांच्या भेटी घेतल्या. त्यावेळेस त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याचे उद्योगपतींना आवाहन केले आहे.

मूलभूत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही उत्तर प्रदेशने लक्षणीय प्रगती केली आहे, असेही योगी म्हणाले. उत्तर प्रदेश राज्यात अधिक लोकसंख्या असल्याने बेरोजगारीमुळे राज्यातील बरेच जण महाराष्ट्रात येतात. राज्याची लोकसंख्या ही एक मोठी साधनसंपत्ती आहे. तसेच त्याचा उपयोग उत्तर प्रदेशातील उद्योगधंद्यांना होणार आहे.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, निरंजन हिरानंदानी, एल अँड टीचे एस. एन. सुब्रह्मण्यम आणि भारत फोर्जचे बाबा कल्याणी यांच्यासह आघाडीच्या कॉर्पोरेट मान्यवरांशी त्यांनी संवाद साधला. पण, आता या संवादाचा किती उत्तर प्रदेशच्या विकासावर किती परिणाम होईल? हेच संशोधनात्मक वाटत आहे.

बुधवारी योगी आदित्यनाथ यांनी मुंबई शेअर बाजारात सत्राच्या सुरुवातीला घंटानादही केला. तसेच बुधवारी योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मुंबई शेअर बाजारात लखनऊ महानगरपालिकेच्या बॉण्डची नोंदणीही झाली आहे. यावेळेस कोरोना काळात लखनऊ महापालिकाने आत्मनिर्भर भारतच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलंय.