‘टीम इंडिया’च्या प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्रींसह ‘ही’ पाच नावे आघाडीवर, कोण बाजी मारणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघावर क्रीडा रसिक नाराज आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील पदावरून हटवण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांनी देखील आपली जबाबदारी उत्तमपणे पार  पाडली नसल्याने त्यांच्यावर देखील नाराजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.  त्यामुळे आता या पदांसाठी अर्ज मागवले असून यामध्ये आतापर्यंत पाच जण शर्यतीत आघाडीवर असून कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची निवड करणार आहे. कपिल देव यांच्या समितीच्या वतीने शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.  वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताला नवा प्रशिक्षक मिळू शकतो.

खालील व्यक्ती होऊ शकतात भारताच्या संघाचे प्रशिक्षक 

१) रवी शास्त्री – भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री पुन्हा एकदा भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्यास उत्सुक आहेत. मात्र त्यांचे वय ५७ वर्ष असल्याने बीसीसीआय त्यांना पुन्हा संधी देणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण बीसीसीआयने प्रशिक्षक हा ६० वर्ष वयाच्या आतील असावा अशी अट ठेवली असल्याने रवी शास्त्री यांना संधी मिळते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

२) गॅरी कर्स्टन –  २०११ मध्ये भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गॅरी कर्स्टन  यांनी देखील भारतीय संघाच्या  प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. त्यांचं वय सध्या ५१ वर्ष ऑन त्यांच्याकडे या पदासाठीचा दीर्घ अनुभव देखील असल्याने या पदासाठी ते उजवे ठरणार आहेत.

३) टॉम मूडी – ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा तगडा अनुभव असून त्यांनी याआधी श्रीलंका संघाला देखील प्रशिक्षण दिले आहे. २००७ मध्ये त्यांनी श्रीलंकन संघाला फायनलमध्ये घेऊन जाण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांचे वय सध्या ५३ वर्ष असून ते देखील या शर्यतीत पुढे आहेत.

४) फील सिमन्स – वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि अफगाणिस्तानचा प्रशिक्षक फिल सिमन्स यानंही प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. त्याच्याकडे प्रशिक्षकपदाचा दीर्घ अनुभव असून त्याने आतापर्यंत आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉम्बे  या संघांचे प्रशिक्षकपद भूषविले आहे.

५) माईक हेसन – न्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हेसन हा देखील भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी शर्यतीत आहे. ४४ वर्षीय माईक हेसन यांच्याकडे न्यूझीलंड संघाच्या प्रशिक्षकपदाचा दीर्घ अनुभव आहे. त्याचबरोबर तो सध्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा देखील प्रशिक्षक आहे.

दरम्यान, कर्णधार विराट कोहली याला संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री हेच हवे असल्याने आता नक्की काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर रवी शास्त्री यांची पुन्हा यापदी निवड झाली तर मला नक्कीच आनंद होईल असे विराट कोहली याने म्हटले होते. त्याचबरोबर मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडते असेही विराट कोहली म्हणाला होता.

आरोग्यविषयक वृत्त