महाविद्यालयीन निवडणुकाचा वाजला बिगुल

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या दोन वर्षांपासून होणार होणार म्हणून गाजावाजा झालेल्या राज्यातील महाविद्यालयांच्या निवडणुका आता नक्की होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे महाविद्यालयीन निवडणुकांचा अध्यादेश मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केला. निवडणुकांना आचारसंहितेचे वेसण घालण्यात आले आहे.

दरवर्षी विद्यापीठाने ३० सप्टेंबरपर्यंत या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. यंदा ही मुदत निघून गेली आहे. सरकारने दोन वर्षांपूर्वी नव्या सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची घोषणा केली होती. निवडणुकीत मेळावे किंवा मिरवणूक काढता येणार नाही. परीक्षा प्रक्रियेत किंवा कोणत्याही अपराधासाठी दोषी ठरविलेल्यांना निवडणूक लढवता येणार नाही. उमेदवारांनी पॅनल तयार करू नये, अशा सूचना आहेत. वर्ग प्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी उमेदवारामागे एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गाच्या प्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी ५ हजार रुपयांची खर्चमर्यादा असेल.

उमेदवाराने धर्म, जात, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे किंवा संघटनेचे चिन्ह, बोधचिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या गटांमधील मतभेद विकोपास जातील किंवा परस्पर द्वेष, शत्रुत्व आणि तणाव निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य न करण्याची खबरदारी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.