मोदींबद्दलचे ‘ते’ वक्तव्य अंगलट ; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांविरुद्ध तक्रार दाखल

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामध्ये उत्साहाच्या भरात काही नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. पंतप्रधान मोदी यांची नांदेडमध्ये होणारी सभा रद्द झाल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी अशोक चव्हाण यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे त्याच दिवशी नांदेडला पंतप्रधानांची विक्रमी सभा झाली. त्यामुळे मतदारांत संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य चव्हाण यांनी सभेपूर्वी केले, असा आरोप होत आहे. त्यांच्या अशा अपप्रचारामुळे आमच्या सभेला काही लोक आले नाहीत अशी तक्रार भाजपचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे.

व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल –

पंतप्रधान नरेद्र मोदी यांची जाहीर सभा ६ एप्रिल रोजी सायंकाळी नांदेडमध्ये होणार होती. पण त्याच दिवशी दुपारी एका प्रचार सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची सभा रद्द झाल्याचे वक्तव्य केले. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. आता या व्हायरल व्हिडीओची सत्यता तपासली जाणार असून त्यानंतर पुढची कारवाई होणार आहे.

पेड न्यूज प्रकरण –

महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पेड न्यूज दिल्याची तक्रार त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. माधव किन्हाळकर यांनी केली होती. चव्हाण यांच्यावर चालत असलेला पेड न्यूज खटला प्रकरणी केंद्रीय निवडणुक आयोगाने त्यांच्याविरोधात आरोप निश्चित केले होते. या गोष्टींचा नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला होता.