Coronavirus News : मुंबईसह पुण्यातही घेतलाय ‘हा’मोठा निर्णय; विमान प्रवाशांना आता ‘कोरोना’ टेस्टची सक्ती !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – युरोपातील ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आलाय. या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशात मोठी खबरदारी घेतली जातेय. मुंबईपाठोपाठ आता पुण्यामध्ये देखील विमान प्रवाशांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही, याची टेस्टची सक्ती करण्यात केलीय.

युरोपियन, आखाती देशातून येणार्‍या प्रवाशांना 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचे सक्तीचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेेत. पुण्यामध्ये येणार्‍या प्रवाशांसाठी 12 हॉटेल्समध्ये राहाण्याची व्यवस्था केलीय. तर, ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील त्यांना नायडू रुग्णालयामध्ये ठेवण्यात येणार आहे, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं आहे.

पुणे शहरामध्ये काल रात्रीपासून संचारबंदी आदेश लागू केले आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांकडून दिलीय. तसेच मालेगाव शहरातही संचारबंदी लागू झालीय. नाशिक जिल्हाधिकार्‍यांनी नाईट कर्फ्यूबाबत आदेश काढला आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातही संचारबंदी निर्णय लागू झालाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केलीय. या निर्णयाची अंमलबजावणी 22 डिसेंबरपासून करण्यात येत आहे. राज्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणार्‍या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचे तसेच अन्य देशांमधून येणार्‍या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश दिलेत.

कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यामध्ये अधिकची खबरदारी घेतली जात आहे. तसेच पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत राज्य सरकारने महापालिका क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतलाय. हा संचारबंदीचा आदेश आता अनेक महत्त्वाच्या शहरात लागू केला आहे.

…तर, कलम 188 नुसार कारवाई
ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी संचारबंदीचे आदेश जारी केलेत. आज रात्री पासून ते 5 तारखेपर्यत हे आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात लागू असतील. या दिवसांत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी असेल. विनाकारण फेरफटका मारण्यास, सायकल, मोटारसायकल किंवा गाडीने अनावश्यक बाहेर पडल्यास, कलम 188 नुसार कारवाई केली जाणार आहे.