महापालिकेच्या कचरा गाडीच्या धडकेत संगणक अभियंता ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महानगरपालिकेच्या कचरा गाडीची धडक बसून संगणक अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव बु. येथे एनएसजी सोसायटीजवळ शुक्रवारी सकाळी घडली. अभियंत्याने हेल्मेट घातलेले होते. परंतु त्याच्या अंगावर कचरा गाडीचे पुढील चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

अंकित जितेंद्र शहा ( २३, रा. मानाजी नगर, मुळ इचलकरंजी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकऱणी सिंहगड रोड पोलिसांनी कचरा गाडी चालक अशोक अण्णा जाधव याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकरणी मयत अंकितचा भाऊ अपुर्व जितेंद्र शहा (२६, मानाजी बाग) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित शहा हा मुळचा इचलकरंजीचा आहे. तो पुण्यात मगरपट्टा सिटी येथे एक्सेंजर कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून नोकरी करत होता. दरम्यान शुक्रवारी सकाळी तो ऑफिसला जाण्यासाठी त्याच्या दुचाकीवरून निघाला. त्यावेळी वडगाव बुद्रुक येथील सदाशिव दांगट पाटील नगर जवळ आल्यानंतर तो एनएसजी सोसायटीकडे जाण्यासाठी वळला. तेथून पुढे जात असताना  पुणे महानगरपालिकेची कचरा गाडी समोर होती. तिला ओव्हरटेक करत असताना कचरा गाडीची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. याधडकेत त्याची दुचाकी खाली पडली आणि कचरा गाडीचे चाक अंगवार गेले. त्याने हेल्मेट घातलेले असतानासुद्धा गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.