तुमच्या सोबत काम करण्यासाठी उत्सूक, PM मोदींकडून Joe Biden अन् कमला हॅरिसचे अभिनंदन

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाईन – जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी सोहळा व्हाइट हाउसच्या प्रांगणात नुकताच पार पडला. म्हणजेच आता अमेरिकेत बायडेन पर्वाला सुरुवात झाली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्राध्यक्ष बायडन आणि उपाध्यक्षा हॅरिस यांचे अभिनंदन करत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील संबंधात अधिक दृढता आणि भागिदारीत वाढ करण्यासाठी, दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

बायडन यांच्यासमवेत काम करत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील भागिदारीला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी संकल्पित आहे. भारत व अमेरिकेची भागिदारी आपल्यासाठी लाभदायक असल्याचेही मोदी म्हणाले. दरम्यान, हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचेही मोदींनी अभिनंदन केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांबाबत कडक भूमिका घेतली होती. अमेरिकेत स्थलांतरितांची संख्या कमी कशी होईल, याप्रकारची धोरणे त्यांनी गेली चार वर्षे राबविली. मात्र आता राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बायडेन स्थलांतर विधेयकाला लगेचच मंजुरी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 1 कोटी 10 लाख स्थलांतरितांना त्या देशाचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अशा नागरिकांमध्ये पाच लाख भारतीय वंशाचाही समावेश आहे. दरम्यान जो बायडेन यांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिले भाषण तयार करणाऱ्या गटाचे प्रमुख आहेत भारतीय वंशाचे विनय रेड्डी. त्यांनी यापूर्वीही निवडणूक प्रचारादरम्यान बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यासाठी भाषणे लिहिली आहेत. विनय रेड्डी हे ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉचे माजी विद्यार्थी आहेत.