काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ मंत्र्याच्या नावाची विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असल्याने या जागेवर पुन्हा एकदा काँग्रेसचाच चेहरा पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान पाडवी यांना याबाबत विचारले असता, राजकारणात अशा प्रकारच्या चर्चा होत असतात, असे वक्तव्य केले आहे.

के.सी.पाडवी यांना विधानसभेतील कामकाजाचा चांगला अनुभव असल्याने कॉंग्रेसकडून त्यांचे नाव सुचवले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा आहे. पण या चर्चेआधी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीही माझ्या नावाची चर्चा होती. त्यामुळे राजकारणात अशा चर्चा होत असतात. मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे पाडवी म्हणाले. आमदार पाडवी हे अक्कलकुवा अक्राणी या मतदार संघाचे 1995 पासून प्रतिनिधीत्व करतात. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाडवी यांच्याकडे काँग्रेसने आदिवासी विकास मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे.