कोरोनाचा कहर ! केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी एकत्र यायला हवे – काँग्रेस

मुंबई : पुन्हा एकदा मुंबईवर लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याचे चित्र दिसत आहे. देशभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. रविवारी राज्यात ४० हजार ४१४ नवीन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईतील निर्बंध वाढताना दिसत आहे. रविवारी राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ६ हजार ९२३ रुग्ण मुंबईत आढळून आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (CoronaVirus) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करण्याचा सल्ला काँग्रेसच्या एका नेत्याकडून देण्यात आला आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी एक ट्विट करत मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांसाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेने एकत्रित येऊन काम करावे, असे आवाहन केले आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ६८,०२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २९१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून, रुग्णांची एकूण संख्या ०१,२०,३९,६४४ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशात ०१,६१,८४३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येपैकी १० टक्के नवीन रुग्ण एकट्या मुंबई शहरातील आहेत. तर त्याचबरोबर देशाच्या एकूण जीडीपीपैकी ६ टक्के वाटा मुंबईचा आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीच्या हितासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने एकत्र यायला हवे. तसेच प्रत्येक प्रौढ मुंबईकरांचे होईल, तितक्या लवकर लसीकरण करायला हवे असे मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात ४० हजार ४१४ नवीन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख ३२ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९५ टक्क्यांवर आले आहे.