Congress Leader Nana Patole | नाना पटोलेंची टीका, ”भाजपाची स्थिती वाईट, सत्ता जाण्याची वेळ आली म्हणून दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने”

मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर आणखी काही काँग्रेस नेते भाजपामध्ये (BJP) जातील, अशी शक्यता भाजपा नेते व्यक्त करत आहेत. त्यातच आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी, त्यांना व कन्या प्रणीती हिला भाजपाने पक्षात येण्याची दोनवेळा ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी भाजपावर बोचरी टीका केली आहे.

नाना पटोले यांनी म्हटले की, भाजपाची स्थिती वाईट आहे. राज्य आणि केंद्रातील सत्ता हातातून जाण्याची वेळ आली आहे. १० वर्षात घोषणाबाजी, जाहिरात आणि खोटेपणा करून सत्ता चालवली. जनतेलाही भाजपाचे दाखवायचे दात वेगळे असल्याचे समजले आहे.

नाना पटोले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असे भाजपाच्याच सर्वेतून समजले. त्यामुळे भाजपा दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देऊन भाजपात खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

पटोले म्हणाले की, भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पराभव दिसू लागला आहे. निवडून कसे यायचे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. विचारसरणी राहिलेली नाही. काहीही करून सत्ता मिळवणे व सत्तेतून जनतेच्या घामाचे पैसे कसे लुटायचे एवढीच त्यांची विचारधारा राहिली आहे. देश विकून देश चालवला जात आहे.

काँग्रेसचे लोकनेते भाजपात कसे येतील यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच त्यांना भाजपाने ऑफर दिली होती असे जाहीरपणे सांगितले आणि ते काँग्रेस सोडून जाणार नाहीत हेही स्पष्ट केले आहे, अशी माहित पटोले यांनी दिली.

पटोले म्हणाले, भाजपाचा सत्तेचा मोह यातून दिसतो. त्यांच्याकडे नेते आणि उमेदवार नाहीत. त्यांच्या पक्षात काँग्रेस व इतर पक्षातीलच अनेक नेते आहेत. भाजपाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा युवक काँग्रेसमध्ये होते.

मिलिंद देवरांच्या भाजपा प्रवेशावर नाना पटोले म्हणाले, देवरा कुटुंब ५० वर्षापेक्षा जास्त काळ काँग्रेसमध्ये होते. विविध पदे भूषवली, खासदार झाले, मंत्री झाले त्यावेळी त्यांना काँग्रेस नकारात्मक वाटली नाही. आत्ताच कशी वाटू लागली. व्यक्तिगत विकास थांबला म्हणून ते गेले आहेत. काँग्रेस पक्ष व काँग्रेसचे नेतृत्व सकारात्मकच आहे, काँग्रेससाठी देश प्रथम आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ”मला आणि प्रणितीला दोन वेळा भाजपाची ऑफर…”