काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींच्या ताफ्याचा अपघात, 4 वाहने एकमेकांना धडकली

रामपूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या ताफ्यातील चार वाहनांचा अपघात झाला, अशी माहिती मिळत आहे. हा अपघात हापूड येथील गढ गंगा टोल प्लाझाजवळ झाल्याचे कळते. या अपघातानंतर ताफ्यातील सर्वजण सुखरूप आहेत.

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर पलटी झाल्याने नवरीत सिंग यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटूंबाची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी रामपूर येथे जात होत्या. तेव्हा त्या राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) नेते जयंत चौधरी यांच्या कुटूंबीयांची देखील भेट घेणार आहेत. त्याच निमित्ताने प्रियंका गांधी यांचा ताफा गढमुक्तेश्वर मार्गे गजरौला येथून रामपूर येथे जात होता. पण, गढ गंगा येथील टोल प्लाझा जवळ या ताफ्याला अपघात झाला.

मिळालेल्या बातमीनुसार, एका वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही, असे सांगितले जात आहे. दरम्यान, नवरींग सिंग यांचा शेवटचा ‘अरदास’ कार्यक्रम आहे. प्रियांका गांधी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. तसेच त्यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन करणार आहेत.

ट्रॅक्टरखाली दबून नवरींग सिंह यांचा मृत्यू
दिल्ली पोलिसांकडून ट्रॅक्टर दुर्घटनेनंतर एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. त्यात, आरटीओ जवळ पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात असलेला एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे. त्याच ट्रॅक्टर खाली येऊन नवरींग सिंग यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाच्या अहवालातही, नवरीत सिंग यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.