काँग्रेसच्या नेत्याचा ग्राफिकल टोला, म्हणाले- पंतप्रधान मोदींची दाढी वाढत गेली, तसा देशाचा GDP घसरत गेला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या घसरलेल्या जीडीपीवरुन कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. थरूर यांनी 2017 पासून 2019-20 या वर्षांतील जीडीपीच्या आकडेवारीची तुलना पंतप्रधान मोदींच्या दाढीशी केली आहे. त्यांनी एक ट्वीट करत पंतप्रधान मोदींना टोला लगावला. थरूर यांनी एका ग्राफिकसोबत मोदींचे 5 फोटो शेअर केले असून यात त्यांच्या दाढीची साईजही वेगवेगळी आहे.

थरुर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 2017-18 च्या चौथ्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी 8.1 टक्के होता. जो 2019-20 च्या दुस-या तिमाहीत 4.5 टक्के राहिला. यालाच ग्राफिक्स इलस्ट्रेशनचा अर्थ म्हणतात असे कॅप्शन दिले आहे. आगामी काळात देशाच्या जीडीपीत सकारात्मक वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कोरोनामुळे जीडीपीमध्ये घसरण झाली होती. 2020-21 दरम्यान जीडीपीमध्ये 6.8 टक्क्याची घसरण दिसून येऊ शकते, असे डीबीएस बँकेने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. 2020 च्या अखेरच्या तिमाहीत जीडीपीचा दर सकारात्मक होऊ शकतो असेही त्यात नमूद केले आहे. देशात कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाल्याने आणि लोकांनी पुन्हा खर्च करण्यास सुरू केले आहे. हे दोन्ही मुद्दे डिसेंबर 2020 च्या तिमाहीसाठी चांगले ठरतील, अस मत डीबीएस समूहाच्या अर्थविषयक तज्ज्ञ राधिका राव यांनी व्यक्त केले आहे.