कॉंग्रेस नेत्याची मागणी : ‘देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका मोदी सरकारवर ठेवण्यात आला आहे. यावरून देशातील विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमानेही टीका केली आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारले होते. त्यातच आता मुंबईतील काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता दत्तू गवाणकर यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर टीका केली आहे. देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांच्या हाती द्या, मग बघा कशी सर्व स्थिती नियंत्रणात येईल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सुशिक्षित आणि अनपढ यांच्यातील फरक लक्षात येईल, असा टोलाही गवाणकर यांनी लगावला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीनेही मोदी सरकारला टोला लगावला आहे. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढत आहे. कोरोना उद्रेकामुळे लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. केंद्र सरकारने आधी अधिकार घेतले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असताना केंद्र हात झटकत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.