मंत्री अस्लम शेख यांनी दिले संकेत, 1 जूनपासून कशावर असेल बंदी, कशात सूट ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र गेल्या काही दिवसात राज्यातील रुग्संख्या आटोक्यात येत असली तरी कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. याबाबत आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. जोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रात लसीकरण 50 टक्क्यांच्या वर जात नाही, तोपर्यंत लॉकडाउनमध्ये कोणतीही शिथिलता देता येणार नाही. तसे केल्यास ते करोनाला पुन्हा आमंत्रण देण्यासाऱखे ठरणार आहे, असे शेख यांनी म्हटले आहे.

मंत्री शेख म्हणाले की, मुंबईच्या बाबतीत विचार केल्यास लसीकरणाचा आकडा अजूनही कमी आहे. नियमांमधून कोणत्या गोष्टींना मुभा देण्यात येईल, याची चाचपणी सुरु आहे. लॉकडाउनमघ्ये कोणते बदल करायचे, कोणती दुकान उघडायची, एसीची दुकाने, सलून, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांना निर्बंधांतून वगळता येईल का? अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी असलेल्या सेवांमध्ये अजून वाढ करता येईल का? याचा विचार सुरु आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोविड टास्क फोर्सकडून अभ्यास करून शिफारशी केल्या जातील.

त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल, असे शेख म्हणाले. दरम्यान तिस-या लाटेला शेख यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. देशात ज्या वेगाने लसीकरण व्हायला हवे होते. ते झाले नाही. केंद्राचे नियोजन व्यवस्थित नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना आणि तरुणांना जास्त धोका असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळेच मुंबईतल्या नव्या जम्बो कोविड सेंटर्समध्ये लहान मुलांसाठी विशेष वॉर्डची व्यवस्था केली आहे. मुंबईत विशेषत: कोविड पेडियाट्रिकच्या डॉक्टरांचा देखील एक टास्कफोर्स तयार केल्याची माहिती शेख यांनी यावेळी दिली.