पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी सोनिया गांधींनी साधला देशवासियांशी ‘संवाद’ !

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील लॉकडाउनचा आज संपत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहे. त्याआधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशवासियांना संबोधित केले आहे. त्यांनी दिवसरात्र मेहनत करणार्‍या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांचे कौतुक केले आहे. लोकांनी लॉकडाउनसह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले आहे. काँग्रेसकडून सोनिया गांधींचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये गांधी यांनी आपण सर्वजण एकत्र मिळून कोरोनाची लढाई लढणे यापेक्षा मोठी देशभक्ती काय असू शकते. सुरक्षा उपकरणांची कमतरता असतानाही आपले योद्धा कोरोनाविरोधातील युद्ध लढत आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी स्वसंरक्षण ड्रेस नसतानाही रुग्णांवर उपचार करत आहेत. स्वच्छता कामगार अनेक सुविधा नसतानाही विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी मदत करत आहेत. सरकारी कर्मचारी देखील महत्त्वाच्या सेवा सुरु राहाव्यात यासाठी मेहनत करत आहेत. पण जर आपण त्यांना पाठिंबा दिला नाही तर ते त्यांचे काम योग्य रितीने करु शकणार नाहीत.

डॉक्टरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत, हे चुकीचे आहे. ही आपली संस्कृती नाही. या लढाईत आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तुमच्यापैकी अनेकजण सॅनिटायझर, रेशनचे वाटप करत वैयक्तिक स्तरावर मदत करत आहात. तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र आहात. आम्ही राज्यात सत्तेत असो किंवा विरोधात पण या लढाईत सर्व काँग्रेस कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत, असे त्यांनी सांगितले.