‘… हा तर गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय, लोकांचे जीव वाचवण्याकडे लक्ष द्या; नव्या घरासाठी अंधळा अहंकार नको’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्र सरकारने दिल्लीमध्ये नव्या संसद भवनाच्या सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रकल्पाचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला आहे. लॉकडाऊन सारख्या निर्बंधांच्या काळात देखील हे काम थांबू नये, असा या मागचा उद्देश आहे. केंद्र सरकारने याला हिरवा कंदील दाखवल्यानंतर या कामाला गती येणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचा भाग असलेल्या पंतप्रधान निवासस्थानाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी गेल्या काही महिन्यांपासून रोजच ट्विटरवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. सेट्रल व्हिस्टा प्रोजेक्टवरुन देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांचा जीव वाचवण्याकडे लक्ष द्या, नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी 10 डिसेंबर रोजी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले होते. या प्रोजेक्ट अंतर्गत पुढील वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होणार आहे. यामध्ये पंतप्रधान निवासस्थानाचीही समावेश असून यासाठी 13 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. पंतप्रधान निवसास्थानाच्या खर्चावरुन प्रियंका गांधी यांनी देखील टीका केली आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या, देशातील लोक जेंव्हा ऑक्सिजन, लस, रुग्णालयातील बेड, औषधे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशावेळी सरकारने पंतप्रधानांच्या नवीन घरासाठी 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल, अशा प्रकारच्या खर्चामुळे सरकारची प्राथमिकता ही अन्य गोष्टींसाठी आहे, असा संदेश लोकांमध्ये जातो, असे प्रियंका म्हणाल्या होत्या.

नव्या संसद भवनाला खर्च किती ?

नव्या संसदेची इमारत ही आत्मनिर्भर भारताचं मंदिर असेल. यामध्ये भारतातील विविधतेचं दर्शन घडेल, जुन्या संसद भवनाच्या इमारतीपेक्षा नवी इमारत 17 हजार स्क्वेअर फूट मोठी असेल. एकूण 64 हजार 500 स्वेअर मीटर जागेत ही वास्तू उभारली जाणार आहे. यासाठी 971 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रोजेक्टचे कंत्राट टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कडे आहे. नव्या संसदभवनात एकूण 1224 सदस्य एकाच वेळी बसू शकतील. 75 व्या स्वातंत्र्यदिनी या संसद भवनातून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु होईल.