देश सुरक्षित व मजबूत भाजपच ठेवू शकतो : किरेन रिजजू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – देश सुरक्षित व मजबूत भाजपच ठेवू शकतो. त्यामुळे देशाला भाजपची आवश्यकता असल्याचा दावा केला आहे. तसेच काही विदेशी व अंतर्गत शक्ती देश खिळखिळा करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) किरेन रिजिजू यांनी आज (गुरुवार) औरंगाबाद येथे केले. ते एक दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी उस्मानपुरा येथील कार्यालयास भेट दिली त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

किरेन रिजिजू पुढे म्हणाले की, औरंगाबादमध्ये क्रिडा खात्यातर्फे विविध प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. औरंगाबादला आल्यानंतर मला विशेष ऊर्जा मिळते. यापूर्वी मी 2018 मध्ये औरंगाबादला आलो होतो, याची आठवण करुन देत किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये आपण कमळ फुलवण्यासाठी कसा संघर्ष केला हे सांगितले.

काँग्रेसने पहाडी भागात कमळ फुलत नसते, असे म्हटले होते. त्यांचे हे म्हणणे खोटे ठरवले आहे. आज अरुणाचल प्रदेशात भाजपचे सरकार आहे. 60 पैकी 51 आमदार भाजपचे निवडून आले. मी स्वत: खासदार म्हणून निवडून आलो असल्याचे किरेन रिजिजू यांनी सांगितले.

महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येऊ
यावेळी किरेन रिजिजू यांनी राज्यातील सत्तेसंदर्भात वक्तव्य करताना म्हटले की, शिवसेनेने धोका दिला, नसता महाराष्ट्रातही भाजपचे सरकार असते, अशी खंत त्यांनी व्यक्त करत पुढच्यावेळी महाराष्ट्रात भाजपचे स्वबळावर सरकार येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.