अयोध्येत रामाचं मंदिर नाही तर बुद्ध विहार उभारा : सावित्रीबाई फुले

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा ऐरणीवर असताना आता अयोध्येत रामाचे नाही तर गौतम बुद्धांचे मंदिर उभे करा अशी मागणी बहराइचच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी केली आहे. बुद्ध धर्म जगातील सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचं प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी बोलताना केलं. यापूर्वी आयोध्येत राम मंदिर त्यानंतर बाबरी मशीद आणि आता त्यानंतर बुद्धाचं मंदिर असल्याचा दावा सावित्रीबाई फुले यांनी केला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार असे दिसते आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत रामाचं मंदिर बांधण्याची तयारी सुरू केल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त जमिनीवर रामाचं मंदिर मुळी कधी नव्हतेच असा युक्तीवाद सावित्रीबाई फुले यांनी केला आहे.’ वादग्रस्त ठिकाणी झालेल्या उत्खननात बुद्धाच्या मूर्ती सापडल्या आहेत .तसंच इतर ही वस्तू हेच सांगतात की तिथे रामाचं नाही तर बुद्ध विहार होते. त्यामुळे अयोध्येत बुद्धाचं भव्य दिव्य मंदिर उभाराव’. गेले ४ वर्ष सावित्रीबाई फुले भाजपच्या खासदार असूनही भाजपवर सडकून टीका करत आहेत. तसंच आरक्षण बदलण्याच्या मोहन भागवतांच्या वक्तव्यावरही त्यांनी कडाडून टीका केली. संघ आणि भाजप विरोधात १६ डिसेंबरपासून त्या निषेध यात्राही काढणार आहे.

भाजपमध्ये राहूनही भाजपचा विरोध कसा करता असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या,’ भाजपचा आणि माझा काहीएक संबंध नाही. मी जिंकण्यायोग्य उमेदवार वाटले म्हणून त्यांनी मला तिकीट दिलं. माझा विजय हा सर्वस्वी माझाच आहे. त्यात भाजपचा काडीमात्र वाटा नाही. त्यामुळे मी त्यांचा विरोध करत राहणार.’

राम मंदिर आणि राजकारण
राम जन्मभूमीवरील प्रस्तावित मंदिर आणि देशाच्या राजकीय पटलावर रंगणारे महाभारत यांचे एक अतूट नाते आहे. आजवर संघ परिवार आणि काही राजकीय पक्षांनी हा विषय धगधगता ठेवून आपापली पोळी भाजून घेण्याचे काम सुरु ठेवले आहे. गेली शेकडो वर्षे धर्म, राजकारण आणि कायदा यांच्या जाळ्यात अयोध्या प्रश्न पुरता अडकला आहे. श्रीरामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा धार्मिक वाद न्यायालयात लोंबकळत पडत असताना मतांच्या राजकारणासाठी या वादाचा पुरेपूर वापर करून घेण्यात आला आहे. या सगळ्यात सर्वाधिक फायदा झाला तो भाजप या पक्षाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा. पुढील निवडणुकीचा विचार करता राम जन्मभूमीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार असे दिसते आहे. रामजन्मभूमीवर रामाचं नाही तर बुद्धाचं मंदिर होतं असा दावा सावित्रीबाई फुले यांनी केला आहे. त्यामुळे आता नवा वाद उफाळून  येणार आहे यात शंका नाही.