काय सांगता ! होय, सोनं 65 हजारांवर जाण्याची दाट शक्यता, वाढणार्‍या किमतीमुळं ‘हा’ मोठा धोका, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्याच्या किमतीत सध्या प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच दररोज वाढणार्‍या किमतीमुळे सोने लवकरच 65 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत कोरोनामुळे देशात आणि जगात अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होत आहे. परंतु, सातत्याने वाढणार्‍या किमतीमुळे नुकसान होण्याची शक्यता सराफा बाजाराने वर्तवली जात आहे. अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे ग्राहकांकडून सोन्याची मागणी कमी होण्याचा धोका असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. शुक्रवारी मुंबईत सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 50 हजार 919 या विक्रमी स्तरावर तर दिल्लीत 10 ग्रॅमचा दर 51 हजार 946 होता.

अर्थव्यवस्थेतील मंदी, रोजगारासंदर्भात अनिश्चितता, सामाजिक अंतर आणि करोना लॉकडाऊनमुळे सामान्य दोन दिवसाच्या तुलनेत फक्त 20 ते 25 टक्के व्यवसाय होत आहे. मागणी पहिल्या पेक्षा खुप कमी आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 900 डॉलरवर पोहोचला असून हा गेल्या 9 वर्षातील विक्रमी स्तर आहे, असे अखिल भारतीय रत्न आणि आभूषण परिषदेचे चेअरमन अनंत पद्मनाभन यांनी म्हटले आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांनी लग्न सोहळ्यांसाठी सुद्धा जास्त खरेदी केली नाही. तसेच आर्थिक आणि कोरोनाच्या कारणामुळे लोक मोठे कार्यक्रम आयोजित करत नसल्याचे दिसत आहे, असे पद्मनाभन म्हणाले.

डब्ल्यूजीसीचे भारतातील पीआर सोमसुंदरम यांनी सोन्याच्या किमतींबाबत म्हटले की,  यांनी सांगितले की, सोन्याचा दर 50 हजार रूपयांच्या वर जाणे ही एक महत्वाची घटना असून त्याबाबत उमटत असलेल्या प्रतिक्रिया स्वाभाविक आहेत. ज्यांनी आधीच गुंतवणूक केली ते मात्र आनंदी आहेत. तर जे अगोदर खरेदी करू शकले नाहीत ते काळजीत आहेत.

दरम्यान, सामान्य ग्राहक सोन्याच्या किमतीत होत असलेली वाढ थांबण्याची किंवा दर कमी होण्याची वाट पहात आहेत. ही वाढ थांबली की हे ग्राहक खरेदी करू शकतील, असाही अंदाज आहे. जानेवारी 2019 पासून सोन्याच्या दरात 60 टक्के वाढ झाली आहे. ऑगस्ट 2019 पासून यात मोठी वाढ झाली. सध्या डॉलर सर्वकालीन उच्च स्तरावर नाही. पण सोने आतापर्यंतच्या विक्रमी स्तरावर आहे.

सोने गाठू शकते 65 हजाराचा टप्पा
सोन्याच्या वाढत्या किमतीबाबत पुण्यातील पीएन गाडगीळचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ गाडगीळ यांनी म्हटले की, करोनामुळे सोन्याच्या मागणीत प्रचंड घट झाली असून जे लोक खरेदी करत आहेत ती कमी प्रमाणात करत आहेत. करोना संकट आणि अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक यामुळे पुढील 12 महिने सोन्याच्या किमती वाढतील. 12 महिन्यात भारतात सोन्याच्या किमती 10 ग्रॅमसाठी 65 हजारावर जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज गाडगीळ यांनी वर्तवला आहे.