खा. तेजस्वी सूर्यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले – भाजपशासित मनपाच्या हॉस्पिटलमध्ये बेडसाठी द्यावी लागते लाच’

बंगळूर : वृत्तसंस्था – कोरोनाच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचीच सत्ता असणाऱ्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात लाच घेऊन कोरोना बाधित रुग्णांना बेड दिले जात आहे. असा गंभीर आरोप बंगळूर दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला आहे. तसेच बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याबाबत खासदार सूर्या यांनी महापालिकेलाच जबाबदार धरले आहे.

खा. सूर्या यांनी आरोप करत म्हटले आहे की, BBMP अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सामंजस्याने बेड देण्याबाबत गैरव्यवहार सुरु आहेत. BBMP साईटवर सगळे बेड फुल असल्याचे दाखवत आहे. परंतु, अनेक रुग्ण रुग्णालयातून डिस्चार्ज होत आहेत. तर रुग्ण डिस्चार्ज होत असल्याने बेड कसे फुल असतील? हे समजण्यापलिकडे आहे, असा सवाल सूर्या यांनी उपस्थित केलाय. BBMP अधिकारी, आरोग्य मित्र आणि बाहेरचे लोक यामध्ये गुंतलेले आहेत. जे रुग्ण कोरोना बाधित आहेत, मात्र गृह विलगीकरणात आहेत त्यांच्या नावे हे बेड आरक्षित केले जात होते. त्या घरी असणाऱ्या रुग्णांना याची माहिती देखील नव्हती. असे एकच नाही तर हजारो बाधित रुग्णांच्या नावे बेड आरक्षण घोटाळा केला आहे. असा खळबळजनक आरोप खा. सूर्या यांनी केलाय.

तसेच, पुढे खा. सूर्या म्हणाले, कोरोना प्रभावित राज्यांमध्ये कर्नाटकचा सुद्धा समावेश आहे. बंगळुरुमध्ये कोरोना स्थिती गंभीर होत जात आहे. शहरातील रुग्णालयात बेड आणि प्राणवायूचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. खा. सूर्या यांच्या या आरोपांनंतर तात्काळ येडीयुराप्पा सरकारने नगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या दरम्यान, नगरपालिकांचे अधिकारी पैसे घेऊन लोकांना बेड उपलब्ध करत आहेत. खा. सूर्या यांच्या आरोपानंतर पोलिसांकडून या प्रकरणी दोघां जणांना अटक करण्यात आली आहे. रोहित आणि नेत्र अशी यांची नावे आहेत. हे दोघे एका बेडसाठी २५ ते ५० हजारांची लाच घेत होते. पोलिसांकडून त्या दोघांच्या खात्यामधून १.०५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.