गरोदरपणात कोरोनाचा संसर्ग झालाय ? बाळालाही धोका पोहोचेल असं वाटतंय? घाबरू नका; जाणून घ्या याबाबत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. लहान मुले, तरुणांना, ज्येष्ठांना कोरोनाची लागण होत आहे. तसेच गर्भवती महिलांनाही याचा संसर्ग होत आहे. मात्र, जर गर्भवती महिलांना कोरोनाचा संसर्ग झाला तर घाबरून जाऊ नये. ऑक्सफर्ड विद्यापीठाने एक अभ्यास केला आहे. या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षानुसार, कोरोनाबाधित गरोदर महिला आणि तिचे होणारे मूल या दोघांनाही त्रास होण्याचा धोका आहे. मात्र, हा अभ्यास छोट्या गटासंदर्भात करण्यात आल्याने निष्कर्ष सरसकट सर्वच गर्भवती महिलांबाबत सत्य मानता येणार नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार, जर गर्भारपणात कोरोना व्हायरसची लागण झाली तर घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. गर्भावस्थेमुळे कोरोनाचा जास्त त्रास होतो असं काहीही नाही. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये कोरोना झाला आणि जर सौम्य लक्षणे असतील तर योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि व्यायाम या त्रिसूत्रीच्या आधारावर रुग्ण घरीच बरा होऊ शकतो. पुढच्या टप्प्यांमध्ये काही त्रास होण्याचा धोका असतो. मात्र, तोही त्या महिलेच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून असतो.

गर्भवतींना कोरोनाचा धोका अधिक हे चुकीचं

गर्भवती महिलांना कोरोनाचा धोका अधिक आहे ही गोष्ट चुकीची आहे. गर्भावस्थेत रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे फक्त कोरोनाच नाही तर सर्वच प्रकारच्या विषाणूंपासून गर्भवतींना धोका असतो. गर्भवतीने आपण विषाणूच्या संपर्कात येणार नाही, अशी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कमीत कमी घराबाहेर पडायला हवे, असे स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले.

…तर प्रसूतीमध्ये धोका नाही

कोरोनामुळे प्रसूती अवघड होते असे नाही. जर ऑक्सिजन लेव्हल नॉर्मल असेल आणि इतर कोणता आजार आईला नसेल तर प्रसूतीमध्ये धोका नाही. प्रसूतीदरम्यान ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. याच कारणामुळे सिझेरियन केले जाते. नॉर्मल डिलिव्हरीदरम्यान होणाऱ्या प्रसूतीवेदनांमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. तो धोका टाळण्यासाठी सिझेरियन केलं जाते.

आईकडून पोटातील बाळाला धोका आहे का?

गर्भातील बाळाला धोका नाही. पण अगदी अपवादात्मक प्रकरणांमध्ये हे शक्य आहे. अशावेळी स्तनपान अधिक महत्त्वाचे आहे. ते करत असताना स्वच्छता, मास्क या नियमांचे पालन करायला हवे. जर बाळाला जवळ घेणे शक्य नसेल अथवा जमत नसेल तर बाळासाठी आईचे दूध काढूनही देता येऊ शकते.

गर्भावस्थेत लस घ्यावी का?

गर्भवतींना लस घेण्याचा अद्यापही सल्ला दिला जात नाही. पण लस घ्यायची असेल तर यावर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा.

डॉक्टरांचा विशेष सल्ला

– गर्दीमध्ये जाणे टाळा, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करा.

– योग्य आहार, व्यायाम करा.

– जास्तीत जास्त सकारात्मक राहून दवाखान्यात जाण्याची घाई करु नका.

– स्वतःच्या मनाने औषधे न घेता प्रत्येकवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

– घाबरुन जाऊ नका. स्वतःला अलग करुन घ्या. दर सहा तासांनी ऑक्सिजनचे प्रमाण तपासा आणि डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहा.

– ऑक्सिजनचे प्रमाण 94 किंवा त्यापेक्षा खाली असल्याचे त्वरीत आपल्या डॉक्टरांना याची माहिती द्या.

– गर्भावस्थेच्या अंतिम टप्प्यात अधिक काळजी घ्या.