विधानसभेत नीतेश राणेंकडून ठाकरे सरकारवर घणाघाती आरोप, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना काळात झालेला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था, टक्केवारीचे गणित आणि सध्या चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरण अशा विविध विषयांवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर विधानसभेत बोलताना जोरदार हल्लाबोल केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरून म्हणाले गुन्हेगारांची हिंमत का वाढतेच याचा विचार व्हायला हवा. गेल्या दीड वर्षांत एक कवच तयार झालंय. मंत्री अडचणीत सापडला की यंत्रणा कामाला लागते, अशी शाब्दिक टीका नीतेश राणे यांनी केली.

नितेश राणे म्हणाले, जम्बो कोविड सेंटरबाबत उल्लेख केला जात आहे. यासंदर्भात अमित साटम यांनी पुस्तक प्रकशित केलं. जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. मुंबईमध्ये नाईट लाइफ नावाची गँग कार्यरत आहे. डिनो मोरिया सरकारचा जावई आहे का ? मनपा आणि सरकारमधील कुठलंही काम असल्यास करुन देतो म्हणून सांगतो, त्याला अधिकार कुणी दिलेत असं त्यांनी म्हटलं. तसेच त्यांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. अध्यक्ष महोदय, राज्याला एक परिवहनमंत्री द्या, राज्याला परिवहन मंत्री नाही. आहेत ते परिवार मंत्री बनले आहेत. ते कलानगरच्या अवतीभवती घुटमळत असतात. कलानगरच्या बाहेर पडावे, मंत्रालय आहे, एसटी कामगार आहेत, त्यांचा पगार आहे, त्यात लक्ष घाला, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, विधानसभेत बोलताना विरोधी पक्षाने आणलेल्या २९३ प्रस्तावावर बोलताना नितेश राणे म्हणाले, अर्थसंकल्पातून जास्त अपेक्षा ठेवू नये, राज्यासमोर आर्थिक संकट आहे असं सरकार सांगत आहे. मात्र हे आर्थिक संकट केवळ शेतकरी आणि कामगारांसांठीच आहे का? परंतु सरकारमध्ये बसलेले लोक राजरोसपणे भ्रष्टाचार करत आहेत. त्याबाबतही विचार झाला पाहिजे. हे आर्थिक संकट केवळ सामान्य लोकांसाठी आहे. त्याबाबत कुणी आवाज उठवत नाही. सरदेसाईंसारख्या व्यक्तींना सरकार का पाठिंबा देतंय. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत राजरोजपणे का फिरतात. ते कंत्राटदारांना फोन का करतात. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा का दिली जातेय. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

तसेच, पूजा चव्हाण प्रकरणी बोलताना म्हणाले, कायदा दुसऱ्यांना लागू आहे तोच अन्य लोकांना लागला पाहिजे. अनेक ऑडिओ क्लिपवरून बरेच काही स्पष्ट होते. तरी बाहेर पडण्यासाठी एवढे दिवस का लागतात. तसेच आमच्या आमदारांना धमकीचे फोन येतात. त्याची चौकशी होत नाही. चित्रा वाघ यांच्या वाहनामागे एक वाहन पाळतीवर असते. आता कुणी धमक्या दिल्यानंतर कारवाई होत नसेल. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था हाती घेतली तर आमच्यावर केस करायच्या नाहीत. काही बोललं की जुन्या केस उकरून काढल्या जाता. असे ते म्हणाले. तसेच आम्हालाही बाळासाहेबांची शिकवण माहिती आहे, अंगावर आले तर शिंगावर घ्या. त्यामुळे जुन्या गोष्टींची आठव थांबावायचा प्रयत्न केला तर मग सोनू निगम पण निघेल आणि आणखी काही निघेल, हे लक्षात ठेवा, असा हल्लाबोल नीतेश राणे यांनी केला आहे.