दिल्ली-पुणे विमानात खळबळ ! टेकऑफ पूर्वीच प्रवासी म्हणाला – ‘मी कोरोना पॉझिटिव्ह’ अन् पुढे असं झालं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण अद्यापही कायम आहे. याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, विविध खबरदारी घेतली जात आहे. विमानप्रवास करतानाही प्रवाशाकडून कोरोना नियमावलीचे पालन करण्यास सांगितले जाते. मात्र, इंडिगो विमानात आज वेगळाच प्रकार घडल्याचे समोर आले.

इंडिगो विमानातील एका प्रवाशाने टेकऑफ पूर्वीच ‘मी कोरोनाबाधित आहे’ असे सांगितले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. इंडिगोच्या 6E-286 या विमानात हा प्रकार घडला. हे विमान पुण्यासाठी टेक-ऑफ करण्याच्या तयारी होते. मात्र, त्याने कोरोनाबाधित असल्याचे सांगितले अन् एकच गोंधळ उडाला. कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्टही त्याने केबिन क्रूला दाखवला. त्यानंतर पायलटने याची माहिती ग्राउंड कंट्रोलरला दिली आणि परतण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, विमानाचे पुन्हा उड्डाण करण्यापूर्वी सर्व सीट्स सॅनिटाईज करण्यात आले. तसेच सर्व सीट्सचे कव्हरही बदलण्यात आले. तसेच सर्व प्रवाशांना PPE कीटही देण्यात आले. उड्डाणाच्या वेळेपर्यंत त्यांना हे घालण्यासही सांगण्यात आले.

प्रवाशाला पाठवले रुग्णालयात

विमानात प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यानंतर विमान दिल्लीत पोहोचल्यानंतर या रुग्णाला रुग्णवाहिकेतून दक्षिण दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. सध्या तेथे त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत.