पुणेकरांनो, काळजी घ्या ! कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर; महापालिकेनं मागितली थेट लष्कराकडे मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसचे थैमान सुरुच आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. ही परिस्थिती इतकी भीषण आहे की रुग्णांना बेडही मिळत नाही. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेकडून लष्कराकडे मदत मागण्यात आली आहे.

पुण्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुमारे 21 हजारांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुण्यात 489 बेड्सला व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे. पुण्यात आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. यापैकी सोमवार सायंकाळपर्यंत एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता पुणे महापालिकेने मदतीसाठी लष्कराला साकडे घातले आहे.

दरम्यान, पुण्यात भारतीय लष्कराचे एक मोठे रुग्णालय आहे. या लष्करी रुग्णालयात 335 बेड्स आणि 15 व्हेंटिलेटरची अद्ययावत सुविधा आहे. खाजगी आणि सरकारी रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता जाणवत असल्यामुळे लष्करी रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने लष्कराकडे मदत मागितली आहे.