कोव्हिड सेंटरमधून ‘बेपत्ता’ झालेल्या ‘त्या’ रुग्णाचा 22 किलोमीटर अंतरावर अपघाती मृत्यू !

जळगाव, 14 जुलै : कोरोना विषाणूची लक्षणे आढळेला संशयित 60 वर्षीय व्यक्ती अमळनेर येथील ‘कोव्हिड केअर सेंटर’मधून बेपत्ता झाला झाला होता. त्यानंतर आता ‘त्या’ वृद्धाचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं आहे. ‘कोव्हिड सेंटर’पासून 22 किलोमीटर दूर असलेल्या पारोळा तालुक्यातील विचखेडा इथल्या महामार्ग क्रमांक सहा येथे वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.

या वृद्धाची सून कोरोनाग्रस्त असल्याने त्यांना ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये दाखल केले होते. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने हे पाऊल उचलले. मात्र, कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्याआधीच हा वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाला होता. त्यामुळे ‘कोव्हिड केअऱ सेंटर’मध्ये खळबळ माजली होती.

दोन दिवसानंतरही ‘तो’ संशयित रुग्ण आढळून न आल्याने ‘कोव्हिड सेंटर’मधील डॉक्टरांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसात मिसिंगची नोंद केली होती. कोव्हिड रुग्णालयातील डॉ. काळे यांनी केलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसात याबाबत तक्रार नोंदवली. मात्र, आता ‘त्या’ बेपत्ता वृद्धाचं अपघाती निधन झाल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.

दरम्यान, ‘ती’ वृद्ध व्यक्ती कोरोना विषाणूच्या भीतीमुळे रुग्णालयातून पळून गेला का ?, असा प्रश्न उपस्थित होत असून याची चर्चा होत आहे. कारण, याअगोदर कोरोनाच्या भीतीमुळे काही रुग्णांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील तपासानंतर नेमकी काय माहिती समोर येते?, याकडे अनेकांचं लक्ष लागले आहे.