पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनापूर्वी कोरोना चाचणी सक्तीची; मंदिर समितीचा निर्णय

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे आकडे दिवसागणिक वाढत चालले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ५ हजार ९८५ आणि शहरात १६ हजार ३९१ इतके बाधित रुग्ण आहेत. सध्या त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तातडीने कोरोना चाचणीचा निर्णय घेतला.

येत्या ५ एप्रिलपासून कोरोना चाचणी झाल्यावरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी मंदिराच्या समोरच संत ज्ञानेश्वर सभामंडपात भाविकांच्या अँटी जेन टेस्टची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर मास्क आणि हातावर सॅनिटायझर फवारणी बंधनकारक करण्यात आली आहे. पण राज्यात सध्या कोरोनाचा फैलाव अत्यंत वेगाने होत आहे.

राज्यातल्या कोरोना सुपरस्प्रेडर टोपटेन हॉटस्पॉट शहरांत आता सोलापूरचेही नाव आले आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर दर्शनाला जाण्यापूर्वी प्रत्येक विठ्ठलभक्ताला आता कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. तसा निर्णय पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे.