Pune News : पुण्यात पुन्हा कंटेन्मेंट झोन ? सिंहगड रोड, बिबवेवाडीसह ‘या’ भागात संसर्ग वाढतोय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   पुण्यातील कोरोना पॉझिटीव्हिटीचा दर 4.6 टक्क्यांवरून 12.5 टक्के एवढा झाला आहे. कोरोना संकट पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आढावा घेण्यासाठी आज महत्त्वाची बैठक पार पडली. महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्तांसह आरोग्य विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

सध्या कोणतेही निर्बंध नव्यानं लागू करण्याचा महापालिकेचा विचार नाही. असं असलं तरी मोठी खबरदारी घ्यायला सुरुवात झाली आहे. तसंच चार वॉर्ड ऑफिस परिसरात कंटेन्मेंट झोनचा विचार देखील महापालिका करत आहे अशी माहिती समजत आहे.

काय म्हणाले महापौर ?

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे क्षेत्रीय कार्यालय परिसरात कोरोना संसर्ग वाढत आहे. जर संसर्ग वाढला तर पुन्हा कंटेन्मेंट झोन सुरू करण्याचा विचार आहे. आता नव्यानं अँटीजेन टेस्ट किट करेदी करण्याचा निर्णय झाला आहे. 4 वॉर्ड ऑफिस परिसरात नव्यानं स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू केलं जात आहे. आरोग्य विभागाला पुन्हा अतिरीक्त मनुष्यबळ पुरवलं जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं.

पुढं बोलताना मोहोळ म्हणाले, पुण्यात आयसीयुसह सर्व प्रकारचे 1163 शासकीय बेड्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांना कोरोनाचे अतिरीक्त बेड्स उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मास्कसंदर्भात पुण्यातही कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे.

मंगळवारी नवीन रुग्णांमध्ये वाढ

मंगळवारी शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा तीनशेच्या पुढं गेला आहे. मंगळवारी शहरात 309 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात 638 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील केवळ तीन जणांचा समावेश आहे.