18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास बंद, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. त्यानंतर 45 वर्षापुढील वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली. कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकारने गाजावाजा करत 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास परवानगी दिली. मात्र लसींच्या टंचाईमुळे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरुवातीपासूनच अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले होते. राज्याला लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाविरोधातील लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात 1 मे पासून सुरु करण्यात आलेले 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तुर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहित राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर राजेश टोपे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राजेश टोपे यांनी सांगितले की, लसीच्या तुटवड्यामुळे 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्त न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या ज्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली आहे त्यांना दुसरा डोस मिळणे अत्यावश्यक आहे. कारण दुसरा डोस दिला नाही तर पहिल्या डोसचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे पहिला डोस दिलेल्यांना आगोदर दुसरा डोस देणे महत्त्वाचे असल्याचे टोपे यांनी सांगितले.

31 मे पर्यंत लॉकडाऊन

राज्यातील लॉकडाऊन हे 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. लॉकडाऊन केल्यानंतर राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. भारतातील सरासरी रुग्णवाढीपेक्षा राज्यात रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काही दिवस वाढवावा, असा कल मंत्रिमंडळाचा होता. तसे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. आता यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, आज दिवसभरात राज्यात 46 हजार 871 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 58 हजार 805 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 46 लाख 196 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.01 टक्के आहे. रुग्ण बरे होत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 78 हजार 07 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.49 टक्के आहे.सध्या राज्यामध्ये 5 लाख 46 हजार 129 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.