Corona Vaccine : … म्हणून देशभरात जाणवतेय कोरोनाच्या लसींची चणचण, RTI मधून समोर आली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे परिणामी, कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, देशात कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवण्यात येत आहे. मात्र वाढत्या लसीकरणासोबत देशात कोरोना लसींचा तुटवडाही जाणवत आहे. मात्र, देशात निर्माण झालेल्या कोरोना लसींच्या टंचाईमागचे धक्कादायक कारण माहितीच्या अधिकारामधून मिळवलेल्या माहितीमधून ( RTI) समोर आले आहे.

आरटीआयमधील माहितीनुसार, ११ एप्रिलपर्यंत देशात कोरोनावरील तब्बल ४५ लाख लसी वाया गेल्या आहेत. लसी वाया घालवण्यामध्ये पाच राज्ये सर्वात पुढे आहेत. विविध राज्यांमध्ये वापरण्यात आलेल्या १०.३४ कोटी डोसांपैकी ४४.७८ लाख डोस वाया गेले, असे आरटीआयमधील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. लस वाया घालवणाऱ्यांमध्ये तामिळनाडू आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये ११ एप्रिलपर्यंत १२.१० टक्के लसी वाया गेल्या आहेत. तर हरियाणामध्ये ९.७४ टक्के लसी वाया गेल्या आहेत. त्यानंतर पंजाब (८.१२), मणिपूर (७.८०) आणि तेलंगाणामध्ये ७.५५ टक्के लसी वाया गेल्या आहेत, अशी माहिती आरटीआयमध्ये नमुद करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोराम, गोवा, दमण आणि दिव, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप येथे कोरोनाच्या लसी फार वाया गेलेल्या नाहीत. देशात ही राज्येही आहेत जिथे कोरोनाच्या लसी वाया गेलेल्या नाही. दरम्यान, १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला होता. सुरुवातीला आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस दिली गेली. आता ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.