Corona Vaccine : नितीन गडकरींचा केंद्र सरकारला महत्वाचा सल्ला, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. दैनंदिन आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी नव्या रुग्ण संख्येचा आलेख वाढलेला होता तो आता खाली येताना दिसत आहे. गेल्या 24 तासामध्ये 4 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तर ज्या राज्यात रुग्ण वाढीचा दर अधिक होता तेथे नवीन रुग्णांचे प्रमाण घटले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे लसीकरण आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र भारतातील अनेक राज्यांमध्ये लसींचा सातत्याने तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. राज्यांनी अपुऱ्या लस पुरवठ्यावरुन केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली आहे. याच दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. विविध संस्थांमधील वैज्ञानिक तसेच विद्यापीठांच्या कुलगुरूंशी त्यांनी मंगळवारी (दि.18) ऑनलाइन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

गडकरींचा केंद्र सरकारला सल्ला
नितीन गडकरी म्हणाले, जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने समस्या निर्माण होत असेल, तर एका कंपनीला परवानगी देण्याऐवजी आणखी 10 कंपन्यांना लस तयार करण्याची परवानगी द्या. त्यांना देशात पुरवठा करु द्या आणि नंतर जास्त निर्मिती झाल्यास ते निर्यात करु शकता. हे 15 ते 20 दिवसात केले जाऊ शकते, असं मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

म्हणून मृतदेह नदीत सोडले जातात
गडकरी पुढे म्हणाले, चंदन ऐवजी डिझेल, इथेनॉल आणि बायोगॅस इंधन आणि विजेचा वापर केला तर अंत्यसंस्कार करणे स्वस्त होईल. बिहार आणि उत्तर प्रदेशात अंत्यसंस्कारासाठी अधिक पैसे द्यावे लागत असल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुरू करणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. पुढील काळात अशी परिस्थिती होऊन नये यासाठी विदर्भाला आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. ऑक्सिजनअभावी कोणाचा जीव जाऊ नये यासाठी विदर्भात तालुका, नगरपरिषदा तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुरु करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

एम्फोटेरेसिन-बी इंजेक्शनची निर्मिती वर्ध्यात
नितीन गडकरी यांनी सांगितले की, कोरोनानंतर अनेकांना काळ्या बुरशीचा रोग होत आहे. त्यासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसिन-बी इंजेक्शनची निर्मिती वर्ध्यात होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.