आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ ट्विटनंतर भाजपा आमदार पडळकरांचा संताप, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार 1 मे पासून राज्यातील 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाईल. त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले आहे. मात्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विट करुन मोफत लसीकरणाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे म्हटले. आदित्य यांनी आपले ट्विट डिलीट करुन यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. मात्र आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समितीमार्फत अधिकृतपणे जाहीर केले जाईल. लोकांत संभ्रम नको म्हणून मी यापूर्वीचे ट्विट डिलीट केल्याचे म्हटले आहे. आदित्य यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये, नागरिकांना मोफत लस मिळणार असल्याचे म्हटले होते. त्यावरुन आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, वाटाघाटी आणि टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी जाहिर केलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये हीच अपेक्षा असल्याचे म्हणत आमदार पडळकरांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरणाचा निर्णय जाहीर झाला आहे. त्यामुळे 45 च्या खालील लोकांना केंद्रसरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, कोविडशील्ड लसीचे दर केंद्रासाठी दीडशे रुपये, राज्याला 400 रुपये आणि खासगींना 600 रुपये आहेत. कोवॅक्सीनची किंमतसुध्दा 600 रुपये राज्यांना व 1200 रुपये खासगींना जाहीर झाली आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. त्यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यास होकार दिल्याचे मलिक यांनी जाहीर केले आहे.