Vaccination : बेजबाबदारपणाचा कळसच ! व्यक्तीला लसीचा पहिला डोस ‘कोव्हॅक्सिन’चा अन् दुसरा ‘कोव्हिशिल्ड’चा

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. परिणामी बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांची गर्दी वाढू लागली आहे. त्याकरिता सर्वत्र लसीकरण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोना लसीचा पहिला डोस ‘कोव्हॅक्सिन’चा दिलेला असताना दुसरा डोस ‘कोव्हिशिल्ड’चा देण्यात आला. ही बाब संबंधित नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यानं लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ घातला. ही घटना समोर आल्यानं आरोग्य विभागालाही धक्का बसला आहे.

पीडित गौरव सिंह सोगवारमध्ये चालक म्हणून काम करतात. पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, २५ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. पहिल्यांदा त्यांना ‘कोव्हॅक्सिन’ लस देण्यात आली होती. लसीचा दुसरा डोस त्यांना २५ मार्च रोजी देण्यात येणार होता. परंतु, या दिवशी काही कारणामुळे ते लस घेण्यासाठी जाऊ शकले नाही. मंगळवारी १३ एप्रिल रोजी ते करोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी जिल्हा मुख्यालयातील लसीकरण केंद्रावर पोहचले. इथे त्यांना करोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. परंतु, आपल्याला ‘कोव्हॅक्सिन’ऐवजी ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा डोस दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली.

आपल्याला लसीचा पहिला डोस ‘कोव्हॅक्सिन’चा आणि दुसरा ‘कोव्हिशिल्ड’चा देण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर गौरव सिंह यांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डेप्युटी सीएमओ आय ए अन्सारी लसीकरण केंद्रावर दाखल झाले. या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश त्यांनी दिलेत. अन्सारी यांनी पीडित व्यक्तीला काहीही होणार नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना थोडा ताप आला होता परंतु, औषध घेतल्यानंतर आता त्यांना स्वस्थ वाटत असल्याचं सांगितलंय. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोणताही साईड इफेक्ट पीडित व्यक्तीत दिसून आला नाही. परंतु, असं होणं हे चुकीचंच असल्याचंही त्यांनी मान्य केलं.

दरम्यान, हे एक अतिशय संवेदनशील प्रकरण असल्यानं या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लसीकरण मोहिमेत दाखल झालेल्या व्यक्तींना पहिला डोस ज्या लसीचा दिला जातोय त्याच लसीचा दुसरा डोस देणं आवश्यक आहे. तसे निर्देशही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेले असताना लसीकरण केंद्रावरचा हा सावळा गोंधळ समोर आला.