Corona Virus : जपानमध्ये पहिला बळी, क्रूझवरील 218 जणांना ‘कोरोना’ची लागण

टोकीयो : वृत्तसंस्था – चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चीनमध्ये या व्हायरसचे प्रमाण जास्त असल्याने त्याठिकाणी परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यातच आता जपानमध्ये एका व्यक्तीचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर अन्य काही देशांमध्येही करोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जपानमध्ये करोनामुळे पहिला बळी गेला असून क्रूझवरही करोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

करोना विषाणूने जपानमध्ये पहिला बळी घेतला आहे. जपानचे आरोग्यमंत्री कात्सुनोबू कातो यांनी याची माहिती दिली आहे. एका 80 वर्षीय वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली त्यावेळी तिला करोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. महिलेची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल येण्याआधीच तिचा मृत्यू झाला. मृत महिला ही टोकियोजवळील एका शहरात वास्तव्यास होती. जपानशिवाय हाँगकाँग आणि फिलीपिन्समध्ये प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

योकोहामा बंदरावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवर करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या
क्रूझवर असलेल्यापैकी आणखी 28 जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे क्रूझवर करोनाची लागण झालेल्यांची संख्या 218 वर पोहचली आहे. यामध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. क्रूझवर असलेल्या काही सुरक्षा अधिकाऱ्यांना देखील करोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.
या क्रूझवर एकूण 3 हजार 711 प्रवासी आहेत. हे क्रूझवर हाँगकाँगवरून आलेल्या एका प्रवाशामुळे क्रूझवरील प्रवाशांना करोनाची लागण झाली आहे. या क्रूझवर 138 भारतीय नागरिक आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारतीय दुतावासाकडून जपान सरकारशी संपर्क साधला जात आहे.