Coronavirus : ‘जनता कर्फ्यू’ आणि ‘लॉकडाऊन’च्या नंतर आता ‘कोरोना’विरूध्द ‘ही’ आवश्यक पावले उचलतोय भारत

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. पॉझिटिव्ह रूग्णांसह मृत्यूंची संख्या देखील वाढत असल्याने संपूर्ण देश या परिस्थितीबद्दल चिंतेत आहे. केंद्र सरकारपासून राज्य सरकारे पूर्णपणे सक्रीय झाली आहेत. जनता कर्फ्यूनंतर देशभरातील 22 राज्यांतील 75 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. रेल्वे-मेट्रो-बस सेवा अशा सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी सरकारने ही कठोर पावले उचलली आहेत. हा धोका लक्षात घेता, सरकारने लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करत अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. परंतु आता पुढे काय ? तर सरकारणं या संकटावर मात करण्यासाठी आणखी प्रवाभी पावले उचलणार आहे.

कोरोना संक्रमित लोकांची ओळख
कोरोना विषाणूची सर्वात धोकादायक बाब म्हणजे सामान्य अहवालात नॉर्मल असणारी लोक देखील नंतर पॉझिटिव्ह निघतात. दुसरीकडे, हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने किंवा संक्रमित भागाद्वारेही पसरतो. आतापर्यंत भारतातील आढळलेले कोरोनाचे रुग्ण जवळजवळ सर्वच परदेशातून परतले आहेत किंवा परदेशातून परत आलेल्या लोकांच्या संपर्कात आहेत. म्हणूनच, आता अशा लोकांची ओळख पटविली जात आहेत जे अलिकडच्या काळात विदेशातून परत आले आहेत. महाराष्ट्र सरकारने याबाबत एक सल्लागार जारी केला आहे आणि कोणाकडे परदेशी प्रवासाचा हिस्ट्री असल्यास आणि कोरोनाशी संबंधित काही लक्षणे असल्यास त्यांना सरकारी रुग्णालयांना माहिती देण्यास सांगितले आहे.

दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने एक पाऊल पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मार्च नंतर परदेशातून परत आलेल्या सर्वांची माहिती काढण्याची जबाबदारी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सोपविली आहे. परदेशातून परत आलेल्या अशा 35 हजार लोकांची ओळख पटली आहे. यानंतर या सर्व लोकांना आता 14 दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाईल. दरम्यान, आजपर्यंत दल्लीत कोरोना विषाणूची 27 प्रकरणे आढळली आहेत, यापैकी 21 रुग्ण परदेशातून आले होते. दिल्लीत एका मृत्यूची नोंद आहे.

क्वारंटाइन
दरम्यान, देशातील बऱ्याच भागात लॉकडाऊन लागू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य सरकारांना काटेकोरपणे त्याचे पालन करण्यास सांगितले आहे. असे असूनही, अशी काही प्रकरणे देखील समोर आली आहेत ज्यात क्वारंटाइन असलेले लोक सार्वजनिक ठिकाणी देखील दिसले आहेत. बेंगळुरू पोलिस आयुक्तांना अशी तक्रार मिळाल्यानंतर त्यांच्या वतीने कडक कारवाई करण्यात आली आहे. बेंगळुरू पोलिस आयुक्तांनी ट्वीट केले आहे की, जर क्वारंटाइन शिक्के असलेले लोक बाहेर दिसले तर 100 नंबरवर कॉल करा, अशा लोकांना अटक केली जाईल आणि त्यांना ‘शासकीय क्वारंटाइन ‘ पाठवले जाईल. तसेच पंजाबच्या जालंधरमध्ये परदेशातून परत आलेल्यांच्या घरांवर स्टिकर लावण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या ओळखीसाठी शिक्का मारला जात आहे.

संक्रमित लोकांची ओळख पटविणे आणि त्यांना क्वारंटाइन ठेवण्याशिवाय सरकारने घेतलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे चाचणी. कोरोनाच्या बचावात त्याची चाचणीही महत्त्वपूर्ण आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जर वेळेत चाचणीची व्यवस्था केली गेली तर या विषाणूचा पराभव होऊ शकतो. देशात आता मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहेत. सरकारी लॅबची संख्या वाढल्यानंतर आता खासगी लॅबनाही कोरोना टेस्टसाठी परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत 89 लॅबमध्ये कोरोनाची तपासणी केली जात होती, परंतु 27 नवीन लॅब तयार करण्यात आल्या आहेत. यासह, कोरोना चाचणीच्या लॅब आता वाढवून 116 झाल्या आहे. या व्यतिरिक्त 6 खासगी प्रयोगशाळांनाही चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

म्हणजेच कोरोनावर मात करण्यासाठी देशांनी ज्या पद्धती अवलंबविल्या आणि डब्ल्यूएचओ देखील कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी जी जास्त प्रभावी पद्धती सांगितली. भारत आता त्या दिशेने वाटचाल करत आहे. परंतु यादरम्यान, लॉकडाऊन अंतर्गत घरात राहणे, खबरदारी घेणे आणि सरकारला पाठिंबा देणेदेखील महत्वाचे आहे.