Coronavirus : लष्करात ‘कोरोना’ बाधित ‘जवान’ सापडल्यानं खळबळ, सैन्यानं 90 कोर्सेस केले ‘स्थगित’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – भारतीय लष्करातील एक जवान कोरोना विषाणू बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्याला लष्कराने सुट्टीवर पाठविले असून त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. लडाखमध्ये नेमणूकीवर असलेला हा ३४ वर्षाचा जवान आहे. त्याचे वडिल अगोदर कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचे वडिल २७ फेब्रुवारी ला इराणवरुन परत आले होते.

त्यानंतर त्यांना २९ मार्च पासून लडाख येथील हार्ट फाऊंडेशनमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या दरम्यान, हा जवान आपल्या परिवाराला मदत करत होता. काही काळासाठी तो चुचोट येथे थांबला होता. ६ मार्चला त्यांच्या वडिलांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला व त्याच्या कुटुंबियांना एस एन एम हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

वडिलांकडून त्याला कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याचे १६ मार्च रोजी स्पष्ट झाले. त्याची पत्नी, बहिण आणि दोन मुलांनाही एस एन एम हार्ट फाऊंडेशनमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. लडाखमध्ये आतापर्यंत ६ रुग्ण आढळून आले असून लडाख तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये परदेशी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.