Coronavirus : पुणेकरांना दिलासा ! शहरातील ‘या’ भागात ‘कोरोना’ रुग्णवाढीची टक्केवारी ‘शून्या’वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. पुण्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. मात्र, प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे आणि पुणेकरांनी केलेल्या सहकार्यामुळे कोरोना आता नियंत्रणात येत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले आहे. सरासरी एक टक्का वाढ मागील दोन आठवड्यात नोंदविण्यात आली आली आहे.

शहरात राज्यातील पहिला रुग्ण 9 मार्च 2020 रोजी आढळून आला. त्यानंतर झपाट्याने रुग्ण वाढत गेले. ऑक्टोबरपर्यंत कोरोनामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना मागील दोन महिन्यात दिलासा मिळाला आहे. औंध-बाणेर, शिवाजीनगर-घोले रस्ता आणि येरवडा-कळस-धानोरी या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये तर या आठवड्यात शून्य टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोनाची घटत चाललेली आकडेवारी पुणेकरांना दिलासा देणारी आहे.

पालिकेकडून दर आठवड्याला कोरोनाचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला जातो. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या 3 फेब्रुवारीच्या अहवालामध्ये मागील दोन आठवड्यातील आकडेवारी देण्यात आली आहे. यामध्ये 21 जानेवारी ते 27 जानेवारी आणि 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीतील वाढ सरासरी एक टक्का नोंदवण्यात आली आहे. यातील तीन क्षेत्रीय कार्यामध्येने 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी कालावधीत शून्य टक्के वाढ दिसत आहे.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले की, रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजन आणि व्हेटीलेटर खाटांची संख्या पुरेशी आहे. लोकांना वेळेत उपचार मिळत आहे. पालिकेच्या प्रत्येक विभागाने केलेल्या कामामुळे आणि नागरिकांच्या प्रतिसादामुळे कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. पालिकेकडून पूर्वी प्रमाणेच तपासण्यास सुरु असल्याची माहिती अगरवाल यांनी दिली.

28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यानची आकडेवारी

क्षेत्रीय कार्यालय एकूण कोरोना रुग्ण टक्केवारी

औंध बाणेर 75 0 %

शिवाजीनगर घोले रस्ता 48 0 %

येरवडा-कळस-धानोरी 69 0 %

1 % वाढ

भवानी पेठ 37 1 %

बिबवेवाडी 62 1 %

धनकवडी-सहकारनगर 71 1 %

ढोले पाटील 34 1 %

हडपसर 121 1 %

कसबा पेठ 61 1 %

कोंढवा-येवलेवाडी 64 1 %

कोथरुड-बावधन 86 1 %

नगर रस्ता 124 1 %

सिंहगड 105 1 %

वानवडी 31 1 %

महापालिका हद्दीबाहेर — 0 %

एकूण 1061 1 % (सरासरी)