Coronavirus : अलिगड मुस्लिम विद्यापीठात कोरोनाचा कहर ! 20 दिवसांत 16 फॅकल्टी अन् 10 निवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेत सर्वसामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांचा बळी जात आहे. अशातच देशातील प्रसिध्द अशा उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापीठातही कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 20 दिवसांत विद्यापीठामध्ये 16 फॅकल्टी आणि 10 निवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. तसेच विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या कोविड वॉर्डमध्ये काही प्राध्यापकांसह एकूण 16 जणांवर उपचार सुरू आहेत.

अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे प्रवक्ते शैफई कि़डवई यांनी सांगितले की, शुक्रवारी (दि. 7) विद्यापीठाातील वैद्यकीय विभागाचे प्रमुख प्रा. शादाब अहमद खान आमि संगणक विभागातील प्राध्यापक रफिकूल जमान खान यांचा मृत्यू झाला. गेल्या 20 दिवसात 16 प्राध्यापकांचा आणि 10 निवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू मन्सूर यांचे भाऊ फारुख यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. ते युनिव्हर्सिटी कोर्टचे माजी सदस्य आणि मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फ्रन्सचे सदस्य होते. दरम्यान संस्कृत पंडित प्रा. खालिद बिन युसुफ यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ऋग्वेदामध्ये डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले मुस्लिम विद्वान होते.