मुंबई, आर्थर रोड तुरुंगात 72 कैद्यांसह 7 कर्मचारी कोरोना बाधित; राज्यातील 8 कारागृह ‘क्वॉरंटाईन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता या विषाणूनं मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातही शिरकाव केला आहे. या तुरुंगातील 72 कैद्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर तुरुंगातील सात कर्मचारीही बाधित झाले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर तुरुंगातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललं. राज्यातील तुरुंगात असलेले अनेक कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले.


तुरुंगामध्ये सोशल डिस्टन्सिंगचंही पालन काटेकोर होईल याकडं विशेष लक्ष दिलं जात आहे. मात्र, मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कोरोना विषाणूने शिरकाव केला. या तुरुंगातील 72 कैद्यांसह सात कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झालं आहे. या सर्व बाधितांना उद्या एका विशेष वाहनातून जीटी रुग्णालयात आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. तर तुरुंगातील बाधित कर्मचाऱ्यांना स्वतंत्र ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या तुरुंग विभागानं दिली.


लॉकडाऊनच्या काळात राज्यातील कारागृहामध्ये कोरोनाचा संसंर्ग पसरू नये म्हणून राज्यातील 8 कारागृह क्वॉरंटाईन करण्यात आले होते. कारागृहातील कर्मचाऱ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था कारागृहातच करण्यात आली होती. या काळात बाहेरचा व्यक्ती कारागृहात प्रवेश करु शकत नव्हता तसेच आत मधील व्यक्ती कोणत्याही कामानिमित्त बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मुंबईतील आर्थर रोड जेल मध्ये स्वयंपाकी यांस कोरोनाची लागन झाली असून त्याच्या संपर्कातील 72 कैद्यांना देखील कोरानाची लागन झाली आहे. या कैद्यांना बृहमुंबई महानगर पालिकेच्या सहकार्यांने महानगर पालिका क्षेत्रात क्वॉरंटाईन करण्यात आले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.