Coronavirus : ‘कोरोना’चा ‘सामना’ करणारे ‘कमांडो’ आपल्याच घरातून ‘बेदखल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करोना व्हायरससारख्या भयंकर महामारीशी आपला जीव धोक्यात घालून लढत इतरांचे प्राण वाचविणाऱ्या कमांडर्स अर्थातच डॉक्टर नर्सेसनाच आपल्या घऱातून बेदखल व्हावे लागत असल्याचे चिंताजनक संकट समोर उभे ठाकले आहे. अशा भयंकर परिस्थितीत करोनाचा सामना करणाऱ्या डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, रुग्णालयातील सफाई कर्मचारी हे घरातून बाहेर पडले. परंतु ते राहत असलेले घर, इमारत, कॉलनी परिसरात मात्र त्यांना करोना संदिग्ध म्हणून पाहिले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत एम्समधील डॉक्टरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता जनता कर्फ्यूदरम्यान करोनाशी लढणाऱ्या कमांडर्सना टाळ्या वाजवून अभिवादन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद तर दिला, मात्र याच लोकांमुळे या समाजात या कमांडर्सना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

काय आहे प्रकरण

घरमालक आपल्या घरी भाड्याने राहत असलेल्या डॉक्टर आणि नर्सेसना घर सोडून जाण्यासाठी दबाव टाकत आहेत. कारण ते करोना बाधितांवर उपचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे करोना संशयित म्हणून पाहिले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत एम्समधील रेसिडन्ट डॉक्टर वेलफेअर असोसिएशन नं गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. केवळ डॉक्टर्सच नव्हे तर पॅरामेडीकल स्टाफ आणि नर्सेसनाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.