Coronavirus : खासगी रुग्णालयांचा ‘ताबा’ घ्या, आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी सरकारचा मोठा ‘निर्णय’

हैदराबाद : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असतानाही राज्य सरकारदेखील आपल्या पद्धतीने उपाययोजना करत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. अशातच आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी सरकारने सर्व खासगी रुग्णालयं आणि स्टाफचा ताबा घेण्याचा आदेश दिला आहे.

आंध्र प्रदेश सरकारने हा आदेश जारी झाल्यानंतर आता जिल्हाधिकारी यांनी सर्व खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष निर्माण करण्याचा आदेश देऊ शकतात. जेणेकरून कोरोनाची लागण झालेल्या सर्व रुग्णांना उपचार सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते. आंध्र प्रदेशात आत्तापर्यंत कोरोनाचे 23 रुग्ण आढळून आले आहेत.

दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमध्येही कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन गाजियाबाद प्रशासनाने देखील खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्याचे आदेश दिले आहेत. गाजियाबादमध्ये कोरोनाची सात रुग्ण आढळून आली आहे. तर तीन डझनहून अधिक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व खासगी रुग्णालयं तात्काळ सुरु करण्याचा आदेश दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर खासगी रुग्णालयं बंद करण्यात आली आहेत. लॉकडाऊनमुळे रुग्णालयातील कर्मचारी कामावर हजर राहू शकत नसल्याचे कारण देत खासगी डॉक्टरांनी आपली खासगी रुग्णालये बंद केली होती. पण आता योगी आदित्यनाथ यांनी ही सर्व रुग्णालये सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकारी यांना सोमवारी आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार जर रुग्णालय सुरु केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

मुख्य सचिव आर.के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल डिस्टनिंग करत रुग्णालयात रुग्णावर उपचार केले जाऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयांमध्ये औषधं आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित असणं गरजेचे आहे. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले आहे.