चिंताजनक ! पुढील 20 वर्षे ‘कोरोना’ लसीची गरज भासणार, आदर पूनावाला यांनी सांगितलं कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगभर हाहाकार घालणाऱ्या कोरोनाचा अनेक देशात प्रसार कमी झाल्यानंतर त्याच वेगानं पुन्हा दुसरी लाट आली आहे. त्यामुळं ही महामारी लवकर नष्ट होणार नाही असं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. जगातील सर्वात मोठी लस निर्माण करणारी कंपनी सीरम इंडिया इंस्टिट्युटचे सीईओ आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरात पुढील 20 वर्षांपर्यंत कोरोनाचा धोका कायम राहणार आहे आणि तोपर्यंत कोरोनाच्या लसीची (Corona Vaccine) गरज भासू शकते.

आदर पूनावाला काय म्हणाले ?

सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आदर पूनावाला यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, “एकदा वापर झाल्यानंतर लसीची गरज संपली असं आतापर्यंतच्या इतिहासात दिसून आलेलं नाही. फ्लू, निमोनिया, पोलियो, कांजण्या या आजारांच्या लसी अनेक वर्षांपासून दिल्या जात आहेत. यातील कोणत्याही आजाराचं लसीकरण बंद करण्यात आलेलं नाही. लोकसंख्येतील 100 टक्के लोकांचं लसीकरण करून झाल्यानंतरही कोरोनाच्या लसीची गरज संपणार नाही.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

कपंनीकडून तयार केल्या जाणार 5 प्रकारच्या लसी

सीरम इंस्टिट्युट 2021-22 च्या शेवटापर्यंत जगभरासाठी एकूण 5 वेगवेगळ्या लसी तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. जवळपास 1 अब्ज डोस तयार केले जाणार आहेत. पूनावाला यांनी सांगितलं की, प्रत्येक तिमाहीत लस लाँच करण्याची आमची योजना आहे. कोविशिल्ड ( COVI-SHIELD) पासून या योजनेची सुरुवात होणार आहे. पुढील वर्षी ही लस यशस्वीरित्या तयार झालेली असेल.

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड यनिव्हर्सिटीतील (University of Oxford) जेनर इंस्टिट्युटद्वारे कोविशिल्ड या लसीचा विकास करण्यात आला आहे. एक्सट्रजेनेका कंपनीकडून या लसीचं लायसन्स प्राप्त झालं आहे. भारतातील 1600 लोकांवर या लसीची शेवटच्या टप्प्यातील चाचणी होणार आहे. पुढील वर्षी ही लस लाँच होण्याची शक्यता आहे. जवळपास 2 ते 3 कोटी डोस तयार करण्याची सुरुवात झाली आहे. पुढं लसीचं उत्पादन वाढवून 7 ते 8 कोटी लसी तयार करण्यात येणार आहेत.

You might also like