‘Janata Curfew’ : शनिवारी रात्री 12 ते रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत कोणतीही ‘प्रवाशी’ रेल्वे ‘धावणार’ नाही, मेल/एक्सप्रेस देखील ‘बंद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा सामना आपण सर्वांनी एकत्र येऊन करायचा आहे.  कोरोनामुळे देशवासीयांना घाबरून जाण्याचे कारण नाही. पण गर्दी करणे, निष्कारण घराबाहेर पडणे टाळायला पाहिजे. पुढील काही आठवडे घरातून बाहेर जाऊ नका. गर्दी करण्याचे टाळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून रविवार (दि.22) ‘जनता कर्फ्यू’चा प्रयोग करू या. या दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 यावेळेत सर्वांनी घरातच राहू या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. त्यानंतर रविवारी अघोषित संचारबंदी लागू करण्याचे काम सुरु झाले आहे. त्याच, पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. देशातील सर्व पॅसेंजर रेल्वेगड्या एक दिवसांसाठी बंद राहणार आहेत.


रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार, देशातील सर्व पॅसेंजर रेल्वे शनिवार (दि.21) मध्यरात्री 12 ते रविवारी (दि.22) रात्री 10 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच. मेल आणि एक्सप्रेस सेवाही रद्द करण्यात येणार असून उपनगरीय सेवाही मोठ्या प्रमाणात बंद ठेवण्यात येणार आहत. दरम्यान, यापूर्वीच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी जवळपास 90 रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वेकडून बंद ठेवण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांची माहिती तिकीट बुकींग केलेल्यांना प्रवाशांना देण्यात येत आहे, तसेच त्यांचे तिकिटाचे पैसेही परत करण्यात येणार आहेत. रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवून 245 करण्यात आली आहे. गुरुवारी 84 रेल्वे गाड्या रद्द करताना सांगण्यात आले होते की कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 155 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रविवारी (दि.22) स्वयंफुर्ती संचारबंदी लागू झाल्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर, दिल्ली मेट्रोनेही एक दिवस मेट्रो बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. डीएमआरसीने एक दिवस मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व मॉल, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मेडिकल दुकान, किराणा दुकान आणि भाजीमार्केट यांना यातून वगळण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारकडूनही अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.