Coronavirus : ‘त्या’ व्हायरल मेसेजवर BMC ने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर येत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा लहान मुलांना जास्त धोका असल्याचा संदेश व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली असून त्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षण जाणवत नसली तरी लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संक्रमित करत आहे. त्यामुळे लहान मुलांना मोकळ्या जागेत खेळायला पाठवू नका. तसेच मॉल्स किंवा इतर ठिकाणी घेऊन जाऊ नका असे म्हटले आहे. मात्र आता मुंबई महापालिकेने ट्विट करत व्हायरल होत असलेला संदेश खोटा असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई महापालिकेने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे. नागरिकांनी ही पोस्ट इतरत्र शेअर करू नये. आम्ही नागरिकांना विनंती करतो की त्यांनी शासनाने दिलेल्या कोरोनाच्या गाईड लाईन्सचे पालन करत शहराला व्हायरसशी लढण्यासाठी मदत करावी, असे या ट्विटमध्ये नमूद केले आहे.