Video : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांचे कौतुकास्पद कार्य; अवघ्या 5 दिवसांत उभारले 40 ऑक्सिजन बेड्सचे रुग्णालय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या पुण्यात आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर याचा मोठा ताण येत असून, आवश्यक सुविधांची कमतरता भासत आहे. असे असताना आता मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी अवघ्या 5 दिवसांत 40 ऑक्सिजन बेड्सचे रुग्णालय उभे केले.

राज्यासह पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण जाणवत आहे. कुठे ऑक्सिजन बेडची गरज तर कुठे इतर काही सुविधांची उणीव. त्यामध्ये नगरसेवक मोरे यांनी विशेष कार्य करत नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी फक्त 5 दिवसांत 40 ऑक्सिजन बेड्स आणि 40 होम आयसोलेशन बेड्स उभारले आहेत. याबाबतची माहिती वसंत मोरे यांनी ट्विट करून दिली. त्यामध्ये ते म्हणाले, की ‘5 दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 बेड ऑक्सिजन आणि 40 बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो तर मग पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त 10 बेड केले असते तर आज संपूर्ण पुणे शहरात 1680 बेड तयार झाले असते’.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे शहरात तब्बल चार तास रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागली होती. त्यामुळे अंत्यसंस्कारांना उशीर झाला होता. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांसाठी वेळेत रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा पुरविता येत नसतील तर त्यांनाही चांगल्या गाड्यांमधून फिरण्याचा अधिकार नाही, असे म्हणत वसंत मोरे यांनी शासकीय गाडी फोडली होती.