15 दिवसांमध्ये भारतासह 29 देशांत पोहचला ‘कोरोना’ व्हायरस, कुठं किती झाले मृत हे जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान शहरापासून पसरलेला कोरोना व्हायरस आता जगातील 29 ठिकाणी पोहचला आहे. यामुळे चीनमधील मृतांच्या आकडेवारीत सतत वाढ होत आहे. गेल्या बुधवारी कोरोनाग्रस्त 242 रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढतच चालला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस संपूर्ण जगासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार आतपर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे 1300 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

केवळ वुहान मध्ये कोरोनाने संक्रमित झालेल्या नवीन 14,800 लोकांची ओळख पटलेली आहे. संपूर्ण चीनमध्ये या व्हायरसने संक्रमित झालेल्या लोकांची संख्या 60 हजार पेक्षा अधिक आहे. यावर लवकरच अंकुश ठेवला नाही तर हा व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरेल असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे.

21 जानेवारी 2020 रोजी चीन व्यतिरिक्त कोरोना इतर देशामध्ये पसरल्याचे समजून आले अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

जाणून घेऊयात नेमकं कधी आणि कोठे आढळला कोरोना…

21 जानेवारी – जपान, तैवान, थाइलंड, अमेरिका
22 जानेवारी – मकाऊ, दक्षिण कोरिया
23 जानेवारी – हाॅंगकाॅंग, सिंगापुर, व्हिएतनाम
24 जानेवारी – फ्रान्स
25 जानेवारी – मलेशिया, नेपाळ
26 जानेवारी – ऑस्ट्रेलिया, कॅनडा
27 जानेवारी – कंबोडिया, जर्मनी, श्रीलंका
29 जानेवारी – फिनलँड, यूएई
30 जानेवारी – भारत, फिलीपीन्स
31 जानेवारी – इटली, रशिया, स्विडन, यूके
1 फेब्रुवारी – स्पेन
4 फेब्रुवारी – बेल्जियम

एकूण 25 इतर देशांनी याबाबत माहिती दिली आहे की, त्यांच्या देशात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. अनेक देशांनी हुबेई मधून आपल्या नागरिकांना काढले आहे. हाॅंगकाॅंग आणि फिलिपिन्समध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे देखील उघड झाले आहे.

व्हिएतनाम येथील मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी हनोईच्या उत्तर-पूर्वेकडील दहा हजार लोकांमध्ये काही संशयित आढळल्याने येथे ‘लॉकडाऊन’ करण्यात आलेले आहे. याठिकाणी एकूण 16 जण संक्रमित आढळले आहेत.

इंग्लंडने त्यांच्याकडे 9 रुग्ण संक्रमित असल्याची खात्री केली आहे. जपानच्या आरोग्य विभागाने सांगितले की, एका जहाजावर 44 लोक कोरोनाने संक्रमित झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये दोन भारतीयांचा देखील समावेश आहे. क्रूज शिप डायमंड प्रिन्सेसवर असलेले 218 लोक कोरोना व्हायरसने संक्रमित झालेले आहेत.

कंबोडिया मधील एका जहाजाला संशय आल्याने अडवण्यात आले कारण हे जहाज दोन आठवडे समुद्रात राहून आले होते आणि पाच देश फिरून आले होते.