जिल्हा प्रशासनाचे कठोर निर्बंध ! ‘या’ शहरात विना मास्क फिरणार्‍यांची रवानगी थेट तुरूंगात

इंदूर : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत अधिकच वाढताना दिसत आहे. तर मध्यप्रदेश राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण जास्त वाढले असल्याने तेथील प्रशासनाने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मध्य प्रदेश येथील इंदूर शहरात काही निर्बंध घातले असून मास्क न घालणाऱ्या नागरिकांना आता थेट तुरंगात टाकण्याचा निर्णय इंदूरचे जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी घेतला आहे.

तर जिल्हाधिकारी सिंह यांनी म्हटले आहे की, इंदूरला सावध राहण्याची आवश्यकता आहे, कारण हे शहर डेंजर झोनमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे निर्बंधांची अंमलबजावणी कठोर स्वरुपात करण्यात येणार आहे. मास्कशिवाय रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांना आता थेट तुरुंगात टाकण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर महापालिकेने एकाच दिवसात २६३१ बेजबाबदार नागरिकांकडून ३ लाख २८ हजार रुपयांची वसुली केली आहे. इंदूरमध्ये गेल्या २४ तासांत ३३०५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली, यातील ३०९ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत तर ८० रुग्णांचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह दिसून आला आहे.

दरम्यान, कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट होत असताना इंदूर शहरात कोरोनाचा फैलाव अधिक वेगानं होताना दिसून येत आहे. जवळपास ७३ दिवसानंतर शहरात एका दिवसात ३०० हून करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर २५ डिसेंबरनंतर गुरुवारी पुन्हा एकदा मोठ्या संख्येत संक्रमित रुग्ण समोर आल्यानं जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याची तयारीही केली जात आहे. प्रशासनाकडून दररोज २५ हजार कोरोना प्रतिबंध डोस देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर इंदूर शहरात सध्या १९६० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यानं सर्वांची चिंता वाढली आहे. यामुळे तेथील जिल्हा प्रशासनाने निर्बंधाबाबत निर्णय घेतला आहे.